विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना ; ऑनलाइन नोंदणीद्वारे लाभ घेण्याचे आवाहन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
रत्नागिरी, दि. 10 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेचा २०२४-२५ मध्ये लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी https:\hmas.mahait.org पोर्टलवर आपले अर्ज ऑनलाईनरित्या नोंदणीकृत करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे.
१० वी नंतरच्या अभ्यासक्रमांना (११ वी, १२ वी) व १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरीत करण्याकरता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते.
ही योजना यापूर्वी ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येत होती. तथापि, आता योजना २०२४- २५ पासून ऑनलाईन पध्दतीने राबविण्याकरता
विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणारे अर्ज ऑनलाईनरित्या स्वीकृत करण्याबाबतचे मॉड्युल महाआयटीद्वारे दि.३० जुलै २०२४
पासून कार्यरत झालेले आहे. त्यानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज https:\hmas.mahait.org या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना भरता येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जांची प्रिंट काढून ऑफलाईन अर्ज संबंधित वसतिगृह किंवा सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, रत्नागिरी यांचे कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.